'सत्याची बातमी, सर्वात आधी'महाराष्ट्राचा विश्वासार्ह आवाज
बातमी पाठवा
जाहिरातजाहिरात

सध्या अपघात आणि गंभीर आजारांसाठी १०८, तर गर्भवती महिला व बालकांसाठी १०२ ही रुग्णवाहिका सेवा स्वतंत्रपणे कार्यरत आहे.

SHARE:

सध्या अपघात आणि गंभीर आजारांसाठी १०८, तर गर्भवती महिला व बालकांसाठी १०२ ही रुग्णवाहिका सेवा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. या सेवांमधील तांत्रिक अडचणी आणि समन्वयाच्या अभावामुळे काही वेळा रुग्णवाहिका मिळण्यास विलंब होतो. हे लक्षात घेऊन दोन्ही सेवांचे एकत्रीकरण करून एकाच मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून कॉलचे व्यवस्थापन केले जाणार आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर जवळ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तातडीने रवाना करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणेसह रुग्णवाहिका
राज्यातील ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी नवीन रुग्णवाहिकांचे जाळे उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रगत जीवनरक्षक सुविधा असलेल्या ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट (ALS) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिकांचा समावेश असेल. या सर्व रुग्णवाहिका जीपीएस प्रणालीशी जोडलेल्या असतील. त्यामुळे नियंत्रण कक्षाला त्यांचे अचूक ठिकाण समजेल आणि गरजेनुसार जवळची रुग्णवाहिका पाठवणे शक्य होईल. यामुळे रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यास मदत होणार आहे.

‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णांना तातडीने उपचार
अपघात, हृदयविकार किंवा अन्य गंभीर वैद्यकीय परिस्थितींमध्ये पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. या काळात उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकते. रुग्णवाहिका सेवांच्या एकत्रीकरणामुळे प्रतिसाद वेळ कमी करण्यास मदत होणार आहे. विशेषतः दुर्गम भागातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात सुरक्षितपणे पोहोचविणे आणि गंभीर रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होईल.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “राज्यातील प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे एकत्रीकरण केल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदत मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होईल. वर्षअखेरीपर्यंत ४ हजार ५०० अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. जीपीएस प्रणाली, जीवनरक्षक उपकरणे आणि एकात्मिक नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांसह संपूर्ण राज्यातील रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देण्यावर भर राहील. या व्यवस्थेमुळे महाराष्ट्राची आपत्कालीन आरोग्य सेवा देशात पथदर्शी ठरेल, असा विश्वास आहे.”

जाहिरातजाहिरात

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरातजाहिरात

ताज्या बातम्या

विभाग

जाहिरातजाहिरात